अमर काणे/जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : ज्या दिल्लीतून देशाचा कारभार चालवला जातो ती दिल्ली प्रदूषणानं प्रचंड वैतागलीय..... एवढी की आठवडाभर दिल्लीतल्या शाळा बंद कराव्या लागल्या.... दिल्ली प्रचंड गजबजलीय..... वाहनांनी, गर्दीनी, गुन्हेगारीनी...... आणि हीच दिल्ली आपण राजधानी म्हणून मिरवतोय.... त्यापेक्षा भारताची राजधानी बदलूनच टाकली तर..... ? त्यासाठी महाराष्ट्रातलं एक शहर सर्वोत्तम आहे.... तिथेच देशाची राजधानी हलवावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होतेय.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर ही देशाची राजधानी व्हावी, यासाठीची ही काही पहिली मागणी नव्हे... नागपूरच्या अमर आणि अनिरुद्ध वझलवार या भावंडांनी गेल्या २५ वर्षापासून ही मागणी रेटून धरलीय... यासाठी त्यांनी तत्कालीन सरकार आणि मंत्रालयाशी पत्रव्यवहारही केलाय. नागपूरला देशाची वैकल्पिक राजधानी करा, अशी त्यांची सुरवातीला मागणी होती...  नागपूर ही देशाची राजधानी व्हाही यासाठी आजही त्यांच्या 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून ते प्रयत्नशील आहेत.


11 जिल्ह्यांच्या विदर्भातलं नागपूर हे सगळ्यात मोठं शहर...... 
कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहाते... म्हणून या शहराचं नाव नागपूर..... त्यामुळेच नागपूर महापालिकेच्या मानचिन्हावरही नागच आहे... 


मध्य प्रदेशातील छिंदवाडा च्या देवगड मधील गोंड राजे बख्त बुलंद शाह यांनी नागपूरला १७०२ मध्ये बारा गावांना मिळवून आपल्या राज्याची राजधानी बनवली... बख्त बुलंद शहा नंतर त्याच्या मुलगा चांद सुलतान नागपूरच्या गादीवर विराजमान झाला... चांद सुलतान याने नागपूरच्या भरभराटी करिता अनेक विकासात्मक कामे केली... रस्ते,तलाव,बांधार्याची निर्मिती केली... चांद सुलतान नंतर १७४२ मध्ये मुधोजी भोसले यांच्याकडे नागपूरची गादी आली... १८१७ मध्ये ब्रिटिशांनी सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा पराभव करीत नागपूर आपल्या ताब्यात घेतले... १८६१ मध्ये सेन्ट्रल प्रोव्हिन्स आणि बेरार जे पुढे व-हाड म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्याची राजधानी नागपूरला करण्यात आली... १९५० मध्ये मध्य प्रदेशची निर्मिती झाली आणि नागपूरला या राज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला... १ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर नागपूरसह विदर्भ महाराष्ट्रात समावेश करण्यात आला... भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर नागपूरनं राजधानीचा दर्जा गमावला पण   राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी करण्यात आलं.


भौगोलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने नागपूरला देशाची राजधानी करण्यची मागणी १९६२ च्या भारत -चीन युद्धानंतर जोर धरू लागली होती... दिल्ली हे नेहमीच आक्रमणाचे केंद्र राहिलंय.. दिल्लीवर आक्रमण करून अनेक राज्यकर्त्यांनी देशावर राज्य केलं.. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर देशाची राजधानी होणं, हे फायदेशीर असल्याचं इतिहास अभ्यासंकांचं म्हणणं आहे.


भारत - चीन युद्धच नाही तर नागपूर ही देशाची राजधानी म्हणून उपयुक्त असल्याचं मत ब्रिटीश नगररचनाकार पॅट्रिक गेडीस यांनी सगळ्यात आधी १९११ साली मांडलं. त्यासाठी त्यांनी भारतातल्या अनेक शहरांची पाहणी केली. नागपूर देशाच्या मध्यभागी असल्यानं वाहतुकीसाठी सोपं आहे, असा अहवाल पॅट्रिक गेडीसनं तत्कालीन ब्रिटीश सरकारला सादर केला होता. नागपूरचं वातावरण आणि हवामान ब्रिटिशांना अनुकूल होतं. मात्र कालांतराने दिल्ली हीच देशाची राजधानी झाली... 


नागपूर देशाच्या मध्यभागी असल्यानं तिथपासून भारतातलं अंतर मोजलं जातं. त्यासाठी ब्रिटीशांनी तिथे शून्य मैलाचा दगड बसवला, आज त्याचं स्मारक झालंय. या हिरव्यागार शहराला एक सोनेरी झळाळीही आहे.... नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रिझर्व बँकेत देशातलं सगळं सोनं साठवून ठेवलेलं असतं.... या सगळ्या गुणांमुळेच ऑरेंग्ज सिटी ही देशाची राजधानी व्हावी अशी मागणी पुन्हा जोर धरतेय... नागपूरकर त्यांच्या व-हाडी पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहेत..... नागपूर देशाची राजधानी झाली तर सगळ्या जगाला नागपूरकरांचं हे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळेल.