योगेश खरे, नाशिक -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटन करताना काही तरुणांच्या गटांत पाण्यातच तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ झी 24 तासने दाखवीला होता. त्यांनतर याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत धिंगाणा घालणाऱ्या आठ तरुणांच्या विरोधात वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले होते. हैदोस घालणाऱ्या या तरुणांना इगतपुरी न्यायालयाने एक दिवसाची शिक्षा देत 100 रूपयांचा दंड केला आहे.


तुफान हाणामारी करणाऱ्या टोळ्या कोणत्या....


चार दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही तरुण पहिनेबारी परीसरात गेले होते. यावेळी येथील नेकलेस धबधब्याच्या नजीक तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. मारामारी करणारे सर्व संशयित सातपूर आणि ओझरखेड परिसरात राहणारे तरुण आहेत. त्यात एका गटात सातपुरचे  नरेश कजबे, गोकुळ  मोंडे, शुभम कापडणीस, राहुल गांगुर्डे आणि दुसऱ्या गटातील महेश मारुती गिदाड, रवी दिवे, विजय शिवाजी मोडे, गुलाब दिवे होते. या दोन गटांच्या हाणामारीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यांच्या विरोधात वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


आठही संशयितांना इगतपुरीच्या सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची जेल म्हणजे न्यायलयात बसवून ठेवण्याची शिक्षा सुनावली. यापूढे असे कधीही करणार नाही असा इशारा देत  प्रत्येकी १०० रुपयांचा दंड केला. यापुढे मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.


भावली आणि पहिने हॉटस्पॉट


या परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स धाबे उभारण्यात आले आहेत. यामध्ये मांसाहारी पदार्थ विकत घेऊन तयार करून दिले जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी खुलेपणाने अवैध मद्यपान करू दिले जाते. परिणामी निसर्ग पर्यटन करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या टोळ्या उन्मत्त होताना दिसतात. अशा परिसरांमध्ये विकेंड पर्यटना वेळी साध्या वेश्यातील पोलीस आणि महिला पोलीस तैनात करण्याची गरज आहे.


नाशिकचे वर्षा पर्यटन


नाशिक जिल्ह्यात सध्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका हा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध झालाय या परिसरातील किल्ले गडकिल्ले तसेच धबधबे हे नाशिक पुणे मुंबई मधील नागरिकांचे आवडते स्थळ बनले आहे. मुंबईच्या अनेक लोकांनी या परिसरामध्ये रिसॉर्ट तयार केले असल्याने खाजगी व्यावसायिक पर्यटन या रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असते. लैला खान पासून तर आत्तापर्यंत अनेक प्रकरण या परिसरांमध्ये उघड झाली आहेत. त्यामध्ये रेव पार्टी खून हत्या मारामाऱ्या असे अनेक प्रकार समोर आले आहेत या सर्व ठिकाणांवर ग्रामीण पोलिसांचा अंकुश मात्र दिसून येत नाही.