Jaipur Mumbai Train Firing: जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट ट्रेनमध्ये 31 जुलै रोजी गोळीबार झाला होता. रेल्वे पोलीस फोर्सचा जवान असलेल्या चेतन सिंहने केलेल्या या गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये मुंबई जीआरपीने शनिवारी आरोपी चेतन सिंहची पत्नी रेणू सिंहची चौकशी केली. तब्बल 11 तास रेणू सिंहची चौकशी करण्यात आली. रेणू सिंहने जीआरपी पोलिसांनी मुंबईत बोलावलं होतं. चौकशी संपल्यानंतर रेणूने दिलेल्या जबाबाची लेखी नोंद करण्यात आली. बोरीवली येथील जीआरपीच्या कार्यालयामध्ये शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रेणूची चौकशी करण्यात आली.


चेतनचे उपचार सुरु आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीआरपीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन सिंह हा चौकशीमध्ये सहकार्य करत नसून अनेकदा आपला जबाब बदलत आहे. तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा चेतन सिंहचा प्रयत्न आहे. तो आजारी असल्याचं नाटक करत आहे. चेतन सिंहवर न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट सुरु होती. यासंदर्भातील कागदोपत्री माहितीही समोर आली आहे. चेतन सिंहचा उपचार आणि मानसिक आरोग्यासंदर्भात रेणूला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र या चौकशीपूर्वीच रेणूने पतीला मानसिक आजार असल्याचं सांगितलं होतं.


औषधं आणि चाचण्याही झाल्या


चेतनची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं रेणूने सांगितलं आहे. चेतन सिंहच्या पत्नीने चौकशीला जाण्यापूर्वी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीमध्ये आपण पती मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे पुरावे सादर करणार असल्याचं रेणूने सांगितलं होतं. "त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. औषधं सुरु होती. त्यांनी तपासण्याही करुन घेतल्या होत्या. मथुरामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं," अशी माहिती रेणूने दिली. 


11 गोळ्या झाडल्या...


जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये चेतन सिंहने केलेल्या गोळीबारामध्ये वरिष्ठ एएसआय टीकाराम मीणा यांच्यासहीत अन्य 3 प्रवाशांची हत्या केली होती. मरण पावलेल्या प्रवाशांची नाव अब्दुल कादिर, असगर अब्बास शेख आणि सैयद सैफुल्लाह अशी असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे पाचच्या सुमारास हा गोळीबार झाला. वेगवेगळ्या डब्यांमध्ये चेतनने गोळीबार केला. चेतनने एकूण 11 गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबार झाल्याचं समजल्यानंतर मुंबईच्या दिशेला येणारी गाडी बोरीवली स्थानकात थांबली तेव्हा मृतदेह गाडीमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर पोलिसांनी या रेल्वेची पहाणी केली होती. या प्रकरणात आरोपी चेतनला अटक केल्यापासून त्याची चौकशी सुरु असून तो दरवेळेस वेगळीच उत्तरं देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत.