बनावट लग्न करून तरुणांना फसवणारी वधूंची बोगस टोळी
आरोपींमध्ये ३ वधुंसह एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : वराकडील मंडळींकडून पैसे उकळून खोटे लग्न करणाऱ्या वधूंच्या एका टोळीला जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ वधुंसह एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
गुजरात मधील तरुणांशी लग्न केल्यानंतर सासरी जाताना तिन्हीही वधूंनी रस्त्यावर गाडी थांबवून बाथरूमला जाण्याचं निमित्त करून पोबारा केल्यानं हा प्रकार उघड झालाय.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून वराकडील मंडळींकडून उकळलेले पैसे, मोबाईल आणि एक क्रूझर गाडी जप्त केली आहे.
गुजरात राज्यातील एका पियुष नावाच्या व्यक्तीने जालन्यातील चंदनझिरा पोलिसांकडे लग्न करून वधूंनी फसवणूक केल्याची तक्रार केली होती.या तक्रारीवरून पोलिसांनी लग्न करून फसवणाऱ्या ३ वधूसह, एक महिला आणि एक पुरुष अशा ५ जणांना जेरबंद केलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यात आणखी काही आरोपी अडकण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.