अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोलिसांनी हिंगोली येथे जाऊन मुलीची सुटका केली.
जालना : हैदराबाद महिला डॉक्टर हत्याकांडाचे पडसाद देशभर उमटले. देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेतील नराधमांचा एन्काऊंटर करण्यात आला. पण अत्याचारी वृत्ती जाण्याचे नाव घेत नाही. दररोज अनेक निष्पाप मुली, महिला यातून जात असतात. यातील काही घटनाच समोर येतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. जालन्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर हिंगोली जिल्ह्यात नेऊन लैगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांसह एका पुरुषाला अटक केली आहे. 23 दिवसांपूर्वी जालन्यातील चंदनझिरा पोलिसांत अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणातील मुलीला हिंगोली जिल्ह्यातील सेलगाव परीसरात डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन मुलीची सुटका केली.
दरम्यान या प्रकरणातील तिन्हीही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.