अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू
Jalgaon Accident : रविवारी रात्री जळगावच्या कन्नड घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना रात्रीच्या सुमारास गाडी दरीत कोसळ्याने हा अपघात झाला.
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : नाशिकमध्ये (Nashik Accident) रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे.
देवदर्शनावरून घरी येत असताना चाळीसगावाजवळील कन्नड घाटात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळली. गाडीमध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला एक पुरुषाचा समावेश आहे. तवेरा गाडीतून हे सर्वजण रात्रीच्या सुमारास घरी परतत होते. मात्र त्याआधीच कन्नड घाटात त्यांची गाडी दरीत कोसळली. गाडीतील सर्वजण हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जखमींना पोलीस प्रशासनाच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मालेगावातील हे सर्वजण तवेरा गाडीने अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते. रविवारी रात्री गाडीने सर्वजण मालेगावला येत होते. मात्र कन्नड घाटात धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती दरीत कोसळली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे.
मृतांची नावे -
प्रकाश गुलाबराव शिर्के,वय -65
शिलाबाई प्रकाश शिर्के,वय -60
वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी,वय -35
पूर्वा गणेश देशमुख, वय -08
दरम्यान, रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला होता. कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले. सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते.