मुंबई : रविवारी रात्री भुसावळ येथे भाजप कार्यकर्त्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर एका अज्ञात इसमाने बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली. स्थानिक भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या या हल्ल्यात पाचजणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणा एका अज्ञाताने केलेल्या या गोळीबारात भाजप कार्यकर्ते रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील खरात, मुलं रोहित आणि प्रेम सागर आणि मित्र सुमीत फेडरे यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्रीच खरात यांच्या निवासस्थानाबाहेर ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ज्यानंतर दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर, तीनजणांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तपासातून समोर आलेल्या काही बाबींनुसार हल्लेखोरांनी बंदूक आणि धारदार शस्त्र (सुरा) वापरत हे कृत्य केलं. ज्यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. 


पोलीस अधीक्षक पंजाबराव उगाळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक पातळीवर पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे. ज्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीही दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्यानंतर आता पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट होत आहे.