जळगाव : शहर महानगरपालिकेत लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेवर लवकरच भगवा फडकणार असे भाकीत शिवसेना नगरसेवक आणि नेत्यांनी व्यक्त केले आहे. जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याची नांदी आता जळगाव शहर महानगर पालिकेत दिसण्याची शक्यता आहे.
 
जळगाव शहर महानगर पालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. विद्यमान महापौर भारती सोनवणे आणि उपमहापौर सुनिल खडके यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपमधील इच्छुकांनी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केली आहे. महापालिकेत  भाजपचे बहुमत असल्यामुळे भाजपचा महापौर होऊ शकतो. परंतु भाजपमधील काही नाराज नगरसेवकांचा गट रविवार पासून संपर्कात नसल्याने वरिष्ठांचे टेन्शन वाढले आहे.
 
 भाजप आमदार गिरिश महाजन यांची महापालिकेत पकड असल्याचे बोलले जात होते. परंतु एकनाथ खड़सेंच्या  राष्ट्रवादी प्रवेशानंतर शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. 
 
त्यामुळे संपर्कात नसलेले भाजप नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाण्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. असे झाल्यास महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
 असा असू शकतो फार्मूला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सध्या भाजपचे नगरसेवक - 57
 सध्या शिवसेनेचे  नगरसेवक - 13 


 इतर - 5


एकूण नगसेवक - 75


बहुमताचा आकडा 38
 
भाजपतील 27 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. जिल्ह्यातील बड्या शिवसेना नेत्याच्या निवासस्थानावर हा प्लॅन ठरल्याचे बोलले जात आहे. 


शिवसेनेचा हा राजकीय डाव यशस्वी झाल्यास, शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री महाजन यांची वर्णी महापौरपदी लागू शकते. अशी माहिती सुत्रांनी दिली  आहे.