जळगाव : आज नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आहे. तर उद्या जळगाव झेडपी अध्यक्षपदाची निवडणूक आहे. नाशिकमध्ये यापूर्वीच शिवसेना काँग्रेस एकत्र असल्यामुळे राष्ट्रवादीही सोबत जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर कोल्हापुरात भाजपची सत्ता आहे. मात्र राज्यतल्या बदलत्या समीकरणांचा परिणाम कोल्हापुरातही होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सत्तापालटाची शक्यता आहे. तर जळगावमध्ये महाविकासआघाडी एकत्र येणार असली तरी सर्व समीकऱणं एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर अवलंबून आहेत.


जळगाव जि.प.मध्ये शिवसेनेची सत्ता येण्यासाठी खडसेंची भूमिका महत्त्वाची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची साथ शिवसेनेला मिळेल असे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत. एकनाथ खडसे आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे.


जळगाव जिल्हा परिषद भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. पण एकनाथ खडसे हे पक्षविरोधी भूमिका घेतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण आतापर्यंत एकनाथ खडसे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली असली, तरी पक्षविरोधी भूमिका घेतलेली नाही.


तर दुसरीकडे अनेक जण शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. आत्तापर्यंत एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. एकनाथ खडसे यांनी याआधी शरद पवार यांच्याशी काही वेळा भेटी घेऊन चर्चाही केली होती. 


एकंदरीत एकनाथ खडसे यांचं मन वळवण्यास स्थानिक शिवसेना नेते आणि राष्ट्रवादीचे नेते यशस्वी झाल्यास जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता येऊ शकते.