Jalna Crime News : पुरोगामी महाराष्ट्रात घरगुती हिंसारातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होताना दिसतेय. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जालन्यात (Jalna Crime) घरगुती हिंसाचारातून (domestic violence) झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीची हत्या करुन याला अपघाती मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेच्या भावाने पोलिसात (Jalna Police) तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडलं


जालन्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी शिवारात हा सर्व प्रकार घडला आहे. आरोपी पतीने पत्नीला अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडलं. त्यानंतर अपघाता बनाव करत आरोपीने यातून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.


भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल


कविता आढाव असं मृत्युमुखी पडलेल्या महिलचं नाव असून गजानन आढाव असं आरोपी पतीचं नाव आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीविरुदध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कविता आणि तिच्या पतीमध्ये वाद होत होता. हा वाद मिटवत कविताच्या माहेरच्यांनी तिला नांदण्यासाठी पुन्हा सासरी पाठवलं होतं. मात्र वादानंतर गजानन आढाव याने कविताची हत्या करत अपघात दाखवण्यासाठी तिला ट्रॅक्टरखाली चिरडल्याचे समोर आले आहे.


तिसरं लग्न आणि वर्षभरातच हत्या


गजानन आढाव हा औरंगाबाद महावितरण कार्यालयात कारकून पदावर कामावर आहे. तर कविता सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत होती. गजाननने कवितासोबत वर्षभरापूर्वी लग्न केले होते. तर गजाननचे हे तिसरे लग्न होते. वर्षभरानंतर गजानन आणि कवितामध्ये वाद सुरु झाला. गजाननने कविताकडे तिच्या माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. यासाठी त्याने कविताला मारहाणही केली होती. यानंतर कविताने गजाननविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर गजानन आणि कविता पुन्हा एकत्र राहू लागले.
 
हत्येचा बनाव उघड


या सर्व प्रकारानंतर आरोपी गजानने कविताला घेऊन औरंगाबाद सोडले आणि हसनाबाद येथे भाड्याने राहू लागला. मात्र कविताने आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचा राग गजाननच्या डोक्यात होता. हाच राग डोक्यात ठेवून आरोपीने  31 डिसेंबरला आपल्याला नातेवाईकाकडे जायचं म्हणून कविताला दुचाकीवर बसवलं.  कुंभारी शिवारातील कोपडा रस्त्यावर रात्री 9 ते 10 च्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गजाननच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टरखाली येऊन कविताचा जागीच मृत्यू झाला. मात्र या अपघातात गजाननला कोणतीही दुखापत झाली नाही. यावरुन कविताच्या भावाचा संशय बळावला आणि त्याने पोलिसांत धाव घेतली.


ट्रॅक्टर चालकावरही गुन्हा दाखल


दरम्यान, गजाननने दिलेल्या माहितीनुसार कविताचा ट्रॅक्टरखाली येऊन मृत्यू झाला. या अपघातात गजाननला कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच ज्या ट्रॅक्टरखाली येऊन कविताचा मृत्यू झाला तो गजानन याच्या नातेवाईकाचा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कविताच्या भावाच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. यासोबत कविताची सासू आणि पाच नणंदांविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकणी हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणा अधिक तपास भोकरदन पोलीस सध्या करत आहे.