नितशे महाजन, झी मीडिया, जालना : शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीतही आईचं नाव न आल्यानं वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वरुड गावात ही घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी देवाघरी जातोय, असं सांगून गजानन वाघ या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. मुलीलाच काय, घरच्या कुणालाही काही कळायच्या आत तो खरंच देवाघरी गेला होता. भोकरदनच्या वरुड गावचा हा शेतकरी आहे.


महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीतही त्याचं नाव आलं नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन गजानन वाघनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. गजानन वाघ हा कुटुंबातील कर्ता पुरूष होता.


वाघ यांच्या कुटुंबाकडं साडेतीन एकर जमीन आहे. त्यांनी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून १ लाख ७५ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. शिवाय आई सुमन वाघ यांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं दीड लाख रुपयांचं कर्ज आहे. पत्नीच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं ५५ हजारांचं कर्ज आहे. आधी परतीच्या पावसानं मक्याच्या पिकाचं नुकसान केलं. त्यात कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव न आल्यानं त्यांनी आत्महत्या केली.


शेतकरी कर्जमुक्तीवरुन भाजपने महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. सरकारनं शेतकऱ्यांसाठी पंचपक्वांनाचं ताट वाढल्याचा दिखावा केला. मात्र ताटात केवळ पापड असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलीय. तर या संबंधित शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तर ही दुर्दैवी घटना टळली असती अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.


कर्जमुक्तीचा लाभ अजूनही गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याची बाब यानिमित्तानं समोर आलीय. आता कदाचित सरकार वाघ कुटुंबियांचं कर्ज माफ करेलही.. पण देवाघरी गेलेला रक्ताचा माणूस मात्र कोणतंही सरकार परत आणू शकत नाही.