Japanese Encephalitis symptoms : पुणेकरांसाठी (Pune) अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. पुणे शहरात पहिल्यांदाच 'जॅपनीज इन्सेफेलायटीस' म्हणजे जेई  (JE) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण सापडला आहे. पुण्यातल्या वडगाव शेरी (Wadgaon Sheri) इथल्या 4 वर्षांच्या बालकात या विषाणूची लक्षण दिसली असून त्याच्यावर 3 नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) बालरोग विभागात उपचार सुरु आहेत. एनआयव्हीमधून याचा अहवाल आला असू हा बालक जेई पॉझिटिव्ह (JE Positive) असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभाग सतर्क
जेई पॉझिटिव्ही रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. ज्या परिसरात जेई पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे, त्या परिसरातील डासांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्या रुग्णाच्या घरातील तसंच आसपासच्या घरातील विशेषतः 15 वर्षाखालील मुलांच्या रक्त नमुने घ्यायला सुरवात करण्यात आली आहे. या परिसरातील तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज 500 ते 600 लोकांचं सर्वेक्षण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.


पुणे शहराच्या आतापर्यंतच्या इतिहासात 'जेई' चा हा पहिलाच रुग्ण आढळून आलेला आहे. याआधी पुण्यात आढळून आलेले रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील होते. पुणे पालिकेकडून (Pune Municipal Corporation) उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.


जेई विषाणूची लक्षणं काय आहेत?
या बालकाला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणं होती. ताप वाढून त्याला तापाचा झटका आला. त्यात त्याचा एक हात आणि पायदेखील कमकुवत झाला. या बालकावर सुरुवातीला खासगी आणि नंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. सध्या ससून रुग्णालयात या बालकावर गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामध्ये थोडी सुधारणा झाली असून, सध्या तो ससूनमध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार घेत आहे


जेई विषाणूचा धोका?
'जेई' हा एक प्रकारचा विषाणूजन्य मेंदूला होणारा संसर्ग आहे. त्याला मेंदूज्वर असंही म्हणतात. यामध्ये रुग्णाच्या मेंदूला सूज येते. सोबत ताप, डोकेदुखीही असते. याचा प्रभाव 1 ते 15 वर्षांच्या वयोगटातील बालकांमध्ये जास्त आढळून येतो. प्रामुख्याने विदर्भात याचे रुग्ण आढळून येत असतात. पुणे जिल्ह्यातही पाच वर्षांपूर्वी याचे रुग्ण आढळले होते. पुन्हा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे. 'क्युलेक्स विष्णोयी आणि क्युलेक्स ट्रायटनोरिन्क्स' हे डास याचे प्रसारक आहेत. पाणथळ भागात या डासांची उत्पत्ती होत असते. तसंच झोपडपट्टी, जंगल, ग्रामीण भागातही हे डास आढळतात. डुकरांचा वावर असलेल्या ठिकाणी या विषाणूच्या प्रसाराची शक्यता जास्त असते.