EXCLUSIVE : तो १० किलोमीटरची मॅरेथॉन एका पायावर धावला आणि जिंकलाही...
त्याचं धैर्य, जिद्द आणि चिकाटी तुम्हाला अचंभित करेल
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणं असं आजपर्यंत आपण केवळ ऐकत आलोय... पण आम्ही ही म्हण प्रत्यक्षात अनुभवली ती एका तरुणाकडून... एका दिव्यांग तरुणाचं सैराट गाण्यावर बेभान होऊन नाचणं प्रसार माध्यमांमध्ये वाऱ्यासारखं पसरलं... त्याचा हा उत्साह 'झी मीडिया'लाही स्वस्थ बसू देत नव्हता... आणि 'झी मीडिया'नं अखेर या तरुणाचा शोध घेतलाच...
जावेद चौधरी... एक जिगरबाज व्यक्तीमत्व... आपण १० मिनिटंही एका पायावर उभं राहू शकणार नाही... पण हा पठ्ठ्या चक्क १० किलोमीटरची मॅरेथॉन एका पायावर धावला आणि जिंकलाही... विजयानंतर 'सैराट' होऊन नाचला. कुतुहलापोटी 'झी मीडिया'नं जावेदला गाठलं खरं पण त्याचं कहाणी ऐकून आम्हीही थक्क झालो...
जावेद मुळचा बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारचा... घरची परिस्थिती हालाखीची... वडिलांचा दुधाचा व्यवसाय... घरात शिकला तो एकटा जावेद... विज्ञान शाखेतून त्यानं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं... तीन वर्षांपूर्वी जावेदचा अपघात झाला आणि त्यात त्याचा एक पाय कायमचा निकामी झाला... पण जावेदनं हार मानली नाही...
जावेद केवळ धावपटूच नाही तर उत्तम गिर्यारोहक... पट्टीचा पोहणारा... उत्तम धावपटू आहे. तो उत्तम नाचतोही... इतकंच नाही तर तो राष्ट्रीय पातळीवरील 'व्हिलचेअर बास्केटबॉल' खेळाडूदेखील आहे. पूर्वी दिल्ली राज्यातून खेळणारा जावेद आता महाराष्ट्रातून खेळतोय... आणि त्याची निवड भारताच्या संघातही झालीय. सध्या पुण्यात तो एमपीएससी, यूपीएससीची तयारी करतोय... आणि खेळाचा सरावही...
पुढच्या महिन्यात तो भारताकडून लॅबेनॉनला खेळायला जाणार आहे... पण त्याच्यापुढे सर्वात मोठी अडचण आहे ती घरच्या आर्थिक परिस्थितीची... आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी जावेदकडे व्हिलचेअर देखील नाही... ती घेण्यासाठी त्याला पाच लाखांची गरज आहे.. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत.. अनंत अडचणींशी सामना करणारा जावेद आपल्या जगण्यातून अनेकांना बळ देतोय.
जावेदच्या संघर्षाला साथ देण्यासाठी...
स्टेट बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक - ३२९८२८६८२७८
IFSC कोड - SBIL०००२१६०