Srinagar : देश सेवेत कर्तव्यावर असताना जम्मू काश्मीर येथे गॅस स्फोटात जखमी झालेल्या महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. लातूर (Latur News) जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वीर जवान श्रीधर व्यंकट चव्हाण (वय 32) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. जवान श्रीधर चव्हाण हे जम्मू येथे कर्तव्य बजावत होते. 8 जानेवारी रोजी सकाळी सैनिकांसाठी असलेल्या टेंटमध्ये श्रीधर चव्हाण गेले होते. मात्र अचानक गॅसचा स्फोट झाल्याने श्रीधर चव्हाण गंभीर जखमी झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्फोटात श्रीधर चव्हाण यांचे संपूर्ण शरीर भाजले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची  प्राणज्योत मालवली.  श्रीधर चव्हाण यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या गावी शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी श्रीधर चव्हाण यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले जाणार आहे. त्यानंतर जवान श्रीधर चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, शहीद जवान श्रीधर चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व एक मुलगी असा सहा जणांचा परिवार आहे.



वयाच्या 19 वर्षी सैन्यात मिळवली नोकरी


"जवान श्रीधर व्यकंटराव चव्हाण यांच्या निधनाने वृत्त समजताच गावात शोककळा पसरली आहे. ही बातमी पसरताच गावात दुखःचा डोंगर कोसळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावात चुली पेटवण्यात आलेल्या नाहीत. सैन्यात 13 वर्षे नोकरी करताना श्रीधर चव्हाण इंजिनिअरिंग 120 या बटालियनमध्ये तो कार्यरत होता. त्याचे वय 32 वर्षे असून त्याच्या पश्चात पत्नी आणि एक वर्षाची लहान मुलगी, आई वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे," अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.


थंडीपासून बचावासाठी शेगडीशेजारी झोपला आणि...


दरम्यान, याआधीही आगीमुळे महाराष्ट्राने आणखी एक वीरपुत्र गमावला होता. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील कैलास कालू दहिकर (27) या 15 बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत जवानाचा कुलू-मनाली परिसरातील पॉईंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. 23 डिसेंबर रोजी रात्री कुलू-मनाली येथे कैलास दहिकर यांनी कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी केरोसिनवर चालणारी शेगडी (हिटर) लावली होती. झोपेत असताना आग लागल्याने होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.