Jayant Patil: फडणवीस-अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी; जयंत पाटलांच्या विधानामुळे खळबळ
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते असं खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटलांच्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यत आहे
Jayant Patil on Morning Oath Ceremony: राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा 23 नोव्हेंबर 2019 रोजी झालेला पहाटेचा शपथविधी आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतो. सध्या विरोधी पक्षात असणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) सत्ताधारी अनेकदा पहाटेच्या शपथविधीवरुन लक्ष्य करत असतात. दरम्यान राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या शपथविधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayat Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. जयंत पाटलांच्या या विधानामुळे या शपविधीमागे शरद पवारच (Sharad Pawar) होते का? ही चर्चा पुन्हा रंगली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की "अजित पवार भुलले असतील असं मला वाटत नाही. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. ती उठवण्यासाठी शरद पवारांनी केलेली ही खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी विधानं केली आज महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही".
पुढे ते म्हणाले "त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकारमध्ये त्यांनी काम केलं. राष्ट्रवादी फुटली नाही, तर शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली हे नाकारता येणार नाही".
जयंत पाटलांचं स्पष्टीकरण -
"मला जो प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मी कदाचित शब्द वापरला होता. भाजपाकडे राष्ट्रवादीचा कल आहे अशी टिप्पणी कोणीतरी केली होती. त्याला देण्यात आलेली ही प्रतिक्रिया होती. त्यामुळे शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ते कसं आणि काय झालं हे माहिती नाही. पण शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ झाला," असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे. हा शपथविधी कोणीतरी जाणीवपूर्वक केला असं मला म्हणायचं नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.
शपथविधीचे अनेक लोकांनी वेगळे अर्थ काढले. पण तशी वस्तुस्थिती नव्हती. शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली आणि आमचं सरकार स्थापन होण्यात मदत झाली हे मात्र खरं आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
पहाटेचा शपथविधी
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे कोणालाही कल्पना नसताना राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शपथविधीमुळे खळबळ माजली होती. शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर हा शपथविधी पार पडल्याने आणि शरद पवारांना याची कल्पना नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण अल्पवधीतच हे सरकार कोसळलं होतं आणि अजित पवार स्वगृही परतले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचं एका कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं.