`वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी`, ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप
Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.
Rave party in Thane : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री बार मध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीप्रकरणात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगाल्यानंतर आता ठाण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय कुणाचं आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये सर्व प्रकारची ड्रग्स उपलब्ध होती. सर्व टॉप पेडलर्स देखील मुक्तपणे फिरत होते, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. वर्ल्ड कपच्या नावाखाली आनंदोत्सव साजरा केला जात होता. ट्रॅफिक मॅचमुळे नाही तर रेव्ह पार्टीमुळे झालं होतं. तसेच रेव्ह पार्टीमध्ये 80 टक्के लोक हे मुंबईमधील होते, असा दावा देखील जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
ठाण्याच्या येऊरमध्ये बेकायदेशीर बार, रेस्टॉरंट असून, या बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय कुणाचं आहे? कुणाचे हितसंबंध गुंतले आहेत का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. वनविभाग, ठाणे पोलिसांकडून कारवाई का होत नाही? असे सवाल विचारत येऊरमधील बेकायदा बार, लाऊंजवर कारवाई कधी करणार? यासाठी आव्हाड आक्रमक झाले आहेत. रात्री कानठळ्या बसवणारा आवाज, वाहतूक कोंडी, मद्यपी वाहनचालक आणि प्रचंड गोंधळामुळे येऊर येथील आदिवासींना रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मात्र, ठाणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी धनाढ्य हॉटेल मालकांना संरक्षण देत आदिवासींवरच खोटे आरोप लावून त्यांना धमकावण्याचं पाप केलं, असा आरोप आव्हाडांनी केलाय.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे, मग त्यांनी येऊरमधील बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंट्सला अभय देण्याचा निर्णय का घेतलाय? यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का, ज्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा ते प्रयत्न करतायंत? अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.