लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, जिम ट्रेनरने बायकोसह उचललं हे पाऊल
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, उद्योगधंदे बंद झाले, याचा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : कोरोना आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. उपजीविकेची साधन नसल्यानं आर्थिक परिस्थिती बिघडली. नैराश्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या, तर अनेकांनी पोट भरण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्विकारला.
पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी असाच एक गुन्हा उघडकीस आणला आहे. व्यवसायाने जिम ट्रेनर असलेल्या एका तरुणाने चोरीला मार्ग अवलंबला. बाळासहेब हांडे असं या तरुणाचं नाव असून समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परमार ज्वेलर्समध्ये बायकोच्या मदतीने त्याने दोन तोळ्याच्या मंगळसूत्राची चोरी केली होती.
या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब भांडे याला अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यामुळे उदरनिर्वाहासाठी कोणताच पर्याय नसल्याने या तरुणाने पत्नीच्या सोबतीनं चोरी करायला सुरुवात केली. यासाठी त्याने बायकोलाही बरोबर घेतलं. 30 नोव्हेंबरला एका सराफाच्या दुकानात त्याने दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने दीड लाखाच्या मंगळसूत्राची चोरी केली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या आधारे पोलिसांनी शोध घेऊन बाळासाहेब हांडेला अटक केली.
सहा महिन्यांचे मूल असल्यामुळे बाळासाहेब हांडे याच्या पत्नीला केवळ नोटीस देण्यात आली आहे. या जोडीने पोटभरण्यासाठी आतापर्यंत दोन ते तीन ठिकाणी अशाच पद्धतीने चोरी केली असल्याचा समोर आलं आहे.