व्हिडिओ : ती आली... आणि आपल्या बछड्याला घेऊन गेली!
ऊसतोडीचं काम अंतिम टप्प्यात... बिबट्या आणि त्यांच्या बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न
हेमंत चापुडे, झी २४ तास, जुन्नर, पुणे : आईची माया काय असते ते पुणे जिल्ह्यात पाहायला मिळालं. इथे बिबट्या निवारा केंद्र आणि वन विभाग यांच्या प्रयत्नांमुळे, दोन बिबट्या मादी आणि त्यांच्या बछड्यांची भेट होऊ शकली. ऊसतोडीचं काम अंतिम टप्प्यात आलं असल्यानं पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यातल्या ऊस पट्ट्यातल्या बिबट्या आणि त्यांच्या बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशावेळी मादी बिबट्या आणि तिचे बछडे यांची ताटातूट होऊ नये यासाठी बिबट्या निवारा केंद्र आणि वन विभाग यांनी पुढाकार घेतला... आणि आईपासून दुरावलेल्या बछड्यांचं व्यवस्थित संगोपन करुन त्यांचं रक्षण केलं. आपल्या बछड्यासाठी व्याकुळ मादी बिबट्या अखेर शोध घेत आली आणि आपल्या पिल्लाला सुखरुपपणे घेऊन ती निघून गेली.
मादी बिबट्या आणि बछड्याच्या भेटीचा हा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिबट्या निवारा केंद्र आणि वन विभाग यांना आत्तापर्यंत अशा ५४ बछडे आणि मादी बिबट्यांटी भेट घडवून आणली आहे.