आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : रागातून एका आरपीएफ जवानाने (RPF Jawan) आपल्याच अधिकाऱ्याची हत्या (Murder) केली. तो इतक्यावरच थांबला नाही तर तर तो दुसऱ्या अधिकाऱ्याची हत्या करण्यासाठी तो निघाला, वेळीच पोलिसांनी (Kalyan Police) त्याला बेड्या ठोकल्या. कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव पंकज यादव असं असून कोळसेवाडी पोलिसांनी त्याला पेण इथून पहाटे तीन वाजता अटक केली, असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
कल्याणच्या रेल्वे बॅरॅकमध्ये रात्री उशिरा हे हत्याकांड घडलं. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या 4 तासात आरोपी पंकजला अटक केली. आर पी एफ चे अधिकारी बसवराज गर्ग आणि पंकज यादव हे काही वर्षांपूर्वी कल्याणच्या रेल्वे पोलिसात एकत्र काम करत होते. त्यावेळेस पंकजचे तिथल्या एका पोलिसाशी भांडण झालं होतं.


या प्रकरणात पंकज यादवची खात्यांतर्गत चौकशी सुरु होती. यात बसवराज गर्ग आणि इतर पोलीस अधिकारी होते. पंकज यादव दोषी आढळल्याने त्याचं इन्क्रिमेंट रोखण्यात आलं, तसंच बेसिक पेमेंटही कमी करण्यात आलं. त्यामुळे पंकज यादव प्रचंड संतप्त झाला होता. त्याच्या डोक्यात बसवराज गर्ग यांच्याविषयी राग होता, यातूनच त्यांना संपवण्याचा कट त्याने आखला.


अधिकाऱ्यांच्या चौकशी मुळे आपले नुकसान झाल्याचा राग पंकजच्या मनात होता. याच रागातून पंकजने बुधवारी रात्री उशिरा बसवराज राहत असलेल्या कल्याणच्या बॅरेकमध्ये जाऊन त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्या डोक्यात लाकडी दांडकाने प्रहार करत त्यांची हत्या केली. यानंतर खाते अंतर्गत चौकशी करणाऱ्या बर्वे नावाच्या अधिकाऱ्याची हत्या करण्यासाठी तो चिपळूणला निघाला होता. मात्र कोळशेवाडी पोलिसांनी त्याला पेनमधून अटक केली. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत