Kalyan Minor Rape And Murder Case: कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेगाववरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंनी ही माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला अटक केल्यानंतर त्याने बोटाने व्हिक्ट्री साईन दाखवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सदर मुलीला दुकानातून खाऊ घेऊन परतताना गवळीने जबरदस्तीने उचलून रिक्षात घालून पळवून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आलं. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून नराधम आरोपीलाही अटक केली आहे.


नागरिकांनी काढला मोर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. मुलीच्या घरापासून हा मोर्चा काढण्यात आला. देशात आणखी किती निर्भया होणार आहेत? कधी थांबणार महिलांची अवहेलना? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.


बदलापूरच्या आरोपीप्रमाणे कठोर कारवाई केली


बदलापूरप्रमाणे कल्याणच्या आरोपीवर देखील कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे याच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली. त्याची देखील तीन लग्नं झाली होती. कल्याणमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या नराधमाची तीन लग्नं झाली आहेत अशा नराधमावर देखील कठोरात कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे. 


यापूर्वीही केला अपहरणाचा प्रयत्न


सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने आरोपी गवळीची जामीनावर सुटका केली होती. पुन्हा एकदा या आरोपीने या मुलीचे अपहरण करत तिच्याशी गैरकृत्य करून तिची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मागील वर्षीही या आरोपीने या मुलीला भर रस्त्यात गाठून तिचा पाठलाग केला होता. या मुलीला पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न गवळीने केला होता यावेळी या मुलीने प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण देखील केलेली. मात्र यावेळी सुद्धा तिला सोडवण्यासाठी कोणीही पुढं आलं नव्हते. आताही भर रस्त्यातून आरोपीने मुलीला उचलून नेताना अनेकांनी पाहिले मात्र कोणीही आरोपीच्या भीतीने पुढे आले नाही. तसेच प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला घाबरुन घटनेची माहिती दिली नाही असा आरोप या मुलीच्या आईने केला आहे.