तब्बल 44 तोळे सोनं आणि दीड किलो चांदीची बॅग तो रेल्वेत विसरला, पुढे घडलं असं काही की...
कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या कार्याला सलाम, अवघ्या 24 तासात लाखो रुपयांचा ऐवज केला हस्तगत
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : ट्रेनने (Express Train) प्रवास करत असताना आपण ट्रेनमध्ये काही तरी सामान विसरतो किंवा ट्रेन सुटल्याने सामान ट्रेनमध्येच राहतं. अशा अनेक घटना घडत असतात. अनेकदा या सामानात मौल्यवान (Valuables) वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्र (Important Document) असतात. ज्या परत कशा मिळवाव्यात याचं टेन्शन आपल्याला असतं. काही वेळा हे सामान मिळतंय, पण काही वेळा ते चोरीला गेलेलं असतं आणि पुन्हा कधीच परत मिळत नाही.
सोनं-चांदीची बॅग विसरल
अशीच एक घटना हैदराबाद-मुंबई डेक्कन एक्सप्रेसमध्ये (Hyderabad-Mumbai Deccan Express) घडली. एका प्रवाशाची तब्बल 44 तोळं सोनं आणि दीड किलो चांदीचे दागिने असलेली बॅक रेल्वेतच राहिली. हैदराबादवरुन आलेला हा प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकावर (Kalyan Railway Station) उतराल. पण रेस्वे स्थानकावर उतरल्यानंतर दागिने असलेली बॅक ट्रेनमध्येच विसल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन निघून गेली होती.
दागिन्यांची बॅग ट्रेनमध्येच राहिल्याने तो प्रवासी प्रचंड घाबरला, त्याने तात्काळ कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. लाखो रुपयांच्या दागिन्यांची बॅग हरवल्याने लोहमार्ग पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. तक्रार दाखल होताच, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे गुन्हे शाखा, एसटीएफ स्टाफचे पथकाने या बॅगेचा शोध सुरू केला.
पोलिसांनी कल्याण, दादर, सीएसटी रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. याच दरम्यान दादर रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती तक्रारदाराने दिलेल्या वर्णनाची बॅग घेवून जाताना आढळून आला. विशेष कृती दलाच्या पथकाने या व्यक्तीचा शोध सुरू केला. तपासात हा व्यक्ती गुजरात अहमदाबाद इथला असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी गुजरात अहमदाबादमधील त्याचा ठाव ठिकाणा शोधत या व्यक्तीला गाठलं आणि त्याच्याकडून दागिने असलेली बॅग ताब्यात घेतली. त्याच्याकडून 23 लाख 55 हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अवघ्या 24 तासात कल्याण लोहमार्ग पोलीस, रेल्वे गुन्हे शाखा आणि विशेष कृती दलाच्या पथकाने अथक तपास करत ही बॅग शोधून काढली. पोलिसांच्या कामगिरीचं आता सर्व स्तरातून कौतुक होतंय.