आतिश भोईर, झी २४ तास, कल्याण : कल्याणमध्ये आज फार मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली. यंत्रणांच्या बेदरकारपणामुळे आज काही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. २४ मे २०१९ रोजी सूरतमध्ये कोचिंग क्लासला लागलेल्या या आगीत २२ जणांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्कीटमुळे ४ मजली कोचिंग क्लासला आग लागली. आग आणि त्याच्या धुरामुळे मुलांचा बाहेर पडायचा मार्गच बंद झाला आणि मुलांनी चौथ्या मजल्यावरून उड्या मारून खाली यायचा प्रयत्न केला. तो त्यांच्या अंगाशी आला... याच इतिहासाची पुनरावृत्ती कल्याणमध्येही पाहायला मिळणार होती. परंतु, सुदैवानं ती टळली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणच्या जितेश इमारतीतली ही घटना... इमारतीतून खोकत, घाईघाईने बाहेर पडणारी मुलं पाहून नागरिकांचा अक्षरशः थरकाप उडाला. इमारतीत तळमजल्यावर असलेल्या चायनीज दुकानाला आग लागली. याच इमारतीत कोचिंग क्लासेस चालतात. आग लागल्यावर धूर सर्व इमारतीत पसरला. इमारतीतल्या रहिवाशांसह मुलांचीही धावपळ उडाली. मुलांना तातडीने या धुरातून कसबसं बाहेर काढण्यात आलं.  


'कल्याण डोंबिवली महापालिका' नावाची एक ढिम्मं यंत्रणा या शहराचं प्रशासन पाहते. एकाच इमारतीत कोचिंग क्लास आणि चायनीज हॉटेल हा अजब प्रकार या शहरातच असू शकतो. या चायनीज हॉटेलमधून वारंवार विविध प्रकारचे खाट उसळतात. झणझणीत फोडण्या तडतडतात. त्यामुळे इमारतीतल्या रहिवाशांचा जीव तसाही कासावीस होतो. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने काहीही कारवाई केलेली नाही. 


इमारतीच्या शेजारील इमारतीतल्या रहिवाशांनीही अगदी मुख्यमंत्र्यांनाही ट्वीट केली आहेत. तरीही मुख्यमंत्री कार्यालयापासून ते महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसपर्यंत सगळीच यंत्रणा इथे झोपलेली दिसून येतेय हे संतापजनक आहे. सूरतची पुनरावृत्ती होता होता थोडक्यात टळली आहे. आता तरी यंत्रणा जाग्या होणार की बळी गेल्यावरच कारवाईचं सोंग आणणार? हाच प्रश्न विचारला जातोय.