लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर :  राज्यात सत्ता बदल होताच त्याचे परिणाम इतर निवडणुकांमध्ये दिसू लागले आहेत. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीनही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. कर्जत जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मतदारसंघात भाजपने (BJP) विजय खेचून आणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम शिंदे विधान परिषदेवर आमदार होताच कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. या यशामुळे रोहित पवार यांना चांगलाच धक्का समजला जात आहे. 


कर्जत तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये १३ पैकी ७ जागा राम शिंदे गटाला मिळाल्या आहेत. तर बजरंगवाडी येथील ७ पैकी ५ उमेदवार शिंदे गटचे विजयी झाले आहेत. तसेच कुळधरण ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून येथील 13 पैकी ७ शिंदे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.


या निवडणुकीत विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या ताब्यात असलेली कोरेगाव ग्रामपंचायत देखील भाजपच्या ताब्यात गेली आहे. तसेच 13 पैकी 7 जागा राम शिंदे यांच्या गटाला मिळाल्या आहेत. 


आमदार झाल्यानंतर कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये एक हाती सत्ता आणण्यात रोहित पवारांना आतापर्यंत यश आलं होतं. कर्जत पंचायत समिती आणि कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळाला. मात्र काही दिवसापूर्वीच झालेले सत्ता परिवर्तन आणि राम शिंदे यांची विधान परिषदेवर झालेल्या नियुक्तीनंतर लगेचच मतदार संघातील राजकीय वातावरण देखील बदलल्याचं पाहायला मिळत आहे.