बेळगाव: सीमाभागातील मराठी भाषिकांना नेहमी गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कृतीमुळे बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. येथील मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीनेही यासाठी आवश्यक परवानगी दिली होती. मात्र, गावातील एका गटाचा या पुतळ्याला विरोधा होता. त्यामुळे पोलीस पुतळा हटवण्यासाठी आग्रही होते. अखेर मनगुत्ती गावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी नरमाईचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे हा वाद शमला, असे वाटत होते. 

मात्र, यानंतरही कर्नाटक सरकारने रातोरात हा पुतळा हटवला. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून हा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.



दरम्यान, कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा त्वरित उभा करावा. अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, अशा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.