Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्तानं गुरुवारी पहाटे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. कार्तिकीच्या निमित्तानं संपन्न झालेल्या या महापुजेसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या सौ. वत्सला घुगे आणि श्री. बबन घुगे या शेतकरी दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याची संधी मिळाली. आपल्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सोहळाच असल्याची प्रतिक्रिया यावेळी या मानाच्या वारकऱ्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी वारकरी दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं पंढरपूरात दाखल झाले असून, अवघी पंढरी नगरी ज्ञानबा तुकारामाच्या नामघोषात तल्लीन झाली आहे. भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला असतानाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. यासाठी 5 टन फुले मागविण्यात आली असून रंगीबेरंगी पानाफुलांनी मंदिरामध्ये नेत्रदीपक  आरास करण्यात आली आहे.


पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी ही सजावट केली असून, तब्बल 22 प्रकारची फुलं यासाठी त्यांनी वापरली आहेत. खास लक्ष्मी कमळ फुले देवासाठी बाहेरील राज्यातून मागवली आहे. देवाचं संपूर्ण मंदिर फुलांच्या बगीचा झाल्याचा भासच होत आहे.



विठ्ठलाचरणी नतमस्तक झाल्यानंतर काय म्हणाले उपमुख्यमंत्री? 


विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून फडणवीसांनी नागरिकांना संबोधित केलं. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशीच विठ्ठलाचरणी प्रार्थना असल्याचं ते म्हणाले. 'समाजात असलेली तेढ दूर करायची असेल तर वारकरी संप्रदाय स्वीकारावा लागेल. एकमेकांचा आदर ठेवावा लागेल. आपले प्रश्न मांडताना इतर समाजाबद्दल अपशब्द वापरू नये', असं ते म्हणाले. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त 


पंढरपूर शहराच्या विकासाचा मुद्दाही त्यांनी यावेळी अधोरेखित करत दिलेल्या आश्वासनांनुसारच कामं सुरु असून, ती पूर्ण होणार असल्याची हमी त्यांनी दिली. यावेळी टीका करणाऱ्यांना पांडुरंग सदबुद्धी देवो असं म्हणत त्यांनी विरोधकांवर नाव न घेता वक्तव्य केलं. राजस्थान निवडणुकांबद्दल प्रश्न विचारलं असता हे राजकीय व्यासपीठ नाही, असं म्हणत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.