Pune Bypoll Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? झी 24 तासवर पाहा निकालाचे Live अपडेट्स
Pune Bypoll Election 2023: प्रतिष्ठेच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba Chinchwad Bypoll Election Results) निकाल उद्या लागणार आहे. मविआ आणि भाजपचे सर्वच प्रमुख नेते कसबा आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून होते त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणूकीचे प्रत्येक अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला झी 24 तासवर पाहिला मिळतील.
Pune Bypoll Election Results 2023: देवेंद्र फडणवीसांच्या प्रचारसभांचा धडाका. भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ठोकलेला तळ.. अजित पवार, शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्या सभा, मेळावे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रातोरात घेतलेली धाव... यामुळे कसबा आणि चिंचवडची निवडणूक (Kasba-Chinchwad By Election) मविआ (Mahavikas Aghadi) आणि भाजपसाठी (BJP) प्रतिष्ठेची बनली आहे. महापालिकेची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात असलेल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या म्हणजे 2 मार्चला लागणार आहे. मविआ आणि भाजपचे सर्वच प्रमुख नेते कसबा आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे कसबा-चिंचवडमध्ये कोण गुलाल उधाळणार.. याची उत्कंठा शिगेला पोहचलीय.
कसबा पोटनिवडणूक (Kasba Bypoll Election 2023 Result)
कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं निधन झालं आणि इथं पोटनिवडणूक लागली. एखाद्या आमदाराच्या निधनाने रिकाम्या झालेल्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध निवडून देण्याची परंपरा राहिली आहे. पण गेल्या काही निवडणुकांमध्ये या परंपरेला बगल देण्यात आली. कसबा पोटनिवडणूकही याला अपवाद नव्हती. कसब्यात भाजकडून हेमंत रासने (Hemant Rasne) तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Raindra Dangekar) यांना उमेदवारी देण्यात आली. पण ब्राम्हण उमेदवार न दिल्याने ब्राम्हण समाजाने नाराजी व्यक्त केली होती. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
प्रमुख नेते प्रचारात
शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने शिंदे-भाजप आणि मविआने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे झाडून सर्व नेते प्रचारात उतरले. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच मंत्री गिरीश महाजन मैदानात उतरले. पण चर्चा झाली ती स्थानिक खासदार गिरीश बापट यांची. आजारी असतानाही गिरीश बापट (Girish Bapat) नाकाला ऑक्सिजनची नळी आणि हाताच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून प्रचारात हजर झाले. दुसरीकडे मविआकडूनही अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांचा प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाला.
चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election 2023 Result)
कसबा पोटनिवडणूकीत दुहेरी तर चिंचवड पोटनिवडणूक तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. या जागेवर लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashiwini Jagtap) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात आली. मविआचे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडोखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे या पोटनिवडणूकीत तिरंगी लढत रंगणार आहे. चिंचवड मतदार संघात सरासरी 45 टक्के मतदान झालं.
एक्झिट पोलचे निकल काय? (Pune Bypoll Election Exit Polls)
पॉलिटीकल रिसर्च अॅनलिसिस ब्युरो या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार कसबा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 49.69 टक्के आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 43.52 टक्के मतदारांनी पसंती दिल्याचं दाखवलंय. तर चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना 44.13 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 35.27 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज वर्तवलाय.
तर द स्ट्रेलेमा संस्थेनं आपल्या एक्झिट पोलमध्ये थेट मतदानाची आकडेवारीच दाखवलीय. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना 74 हजार 422 मतं, तर रासने यांना 59 हजार 351 मत मिळणार असल्याचा दावा केलाय. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना 1 लाख 5 हजार 354 मते तर राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 93 हजार आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 60 हजार 173 मते मिळतील, असा अंदाज वर्तवलाय.
मतमोजणीचा कार्यक्रम कसा असेल (Vote Counting For Pune By Elections 2023)
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीची मतमोजणी उद्या म्हणजे 2 मार्चला सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे इथं सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वात आधी टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी असणार आहेत.
कसा कुठे आणि कधी बघाल निकाल?
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल सर्वात आधी पाहण्यासाठी झी 24 तासच्या पेजला भेट द्या.