प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर - रत्नागिरी : एवढ्या तेवढ्या कारणावरुन निराश होणारे बरेच... पण 'येऊ दे संकट, करुच की त्याच्याशी दोन हात' असं म्हणणारे बरंच काही शिकवतात. रत्नागिरीतली कविता कदम त्यांच्यापैकीच एक... तिनं केलेली कामगिरी थक्क करणारी आहे. तिच्या या कामगिरीला लाभलेली पतीची म्हणजेच दीपक कदम साथ म्हणजे प्रेमाचा नवा आयाम...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट... कविता, पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक असलेले तिचे पती आणि तीन लहान मुलं... असा सुखाचा संसार सुरू होता. तेवढ्यात कविताला ब्रेन ट्युमर झाल्याचं कळलं... कवितावर शस्त्रक्रिया झाली... पण त्यामध्ये कविता ७० टक्के अपंग झाली. कविता अक्षरशः अंथरुणाला खिळून होती. पण तिला उभं करायचंच ही तिच्या नवऱ्याची जिद्द... कविता चालू लागली, व्यायाम करू लागली... वेदनांनी खचून जाण्यापेक्षा प्रत्येक क्षणाला आव्हान देत कविता पुन्हा नव्यानं उभी राहिली.


कविता आणि दीपक कदम

आता, रत्नागिरी जिल्ह्यात कविता कदम हे आता जिद्दीचं हे दुसरं नाव बनलंय. गुहागर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटरची मॅरेथॉन कवितानं पूर्ण केली. ७० टक्के अपंग झालेल्या व्यक्तीनं २१ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करणं हे आश्चर्यकारकच होतं... त्यामुळेच सगळ्यांनी कविताच्या जिद्दीला सलाम केलाय.


कविताची जिद्द तर वाखाणण्याजोगी आहेच... पण, आपलं कुटुंब सांभाळत आपल्या पत्नीला हक्काची आणि प्रेमाची साथ देणाऱ्या तिच्या पतीनंही काहीही न बोलता आपलं प्रेम व्यक्त केलंय. अंथरुण ते मॅरेथॉन हा सगळा प्रवास शक्य झाला ते जोडीदारामुळेच हे सांगताना कविताला अश्रू आवरणंही कठीण झालं.


जिद्द म्हणजे काय, हे कवितानं दाखवून दिलं... तर खरं प्रेम म्हणजे काय हे कविताचे पती दीपक कदम यांनी दाखवून दिलं... त्यामुळेच कवितानं फक्त २१ किलोमीटरची नाही तर 'जगण्याची मॅरेथॉन' जिंकलीय, असं म्हणता येईल.