पुणे : मराठी साहित्यातील सध्याच्या आघाडीच्या लेखिका, कवयित्री कविता महाजन यांच्या पार्थिवावर पुण्यात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. साहित्य तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. कविता महाजन यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारावेळी चित्रीकरण न करण्याची विनंती केली होती. कविता महाजन काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होत्या. गुरुवारी बाणेर येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"नवी जागा अजून मानवत नाहीये... ताप उलटून आला, तो जोमदारपणे. भ्रम भासावळी घेऊन आला. घरात माणसं फिरताना दिसू लागली... पुन्हा डॉक्टरचं दार गाठलं. थोडं काम केलं उठतबसत, पण डोकं चालत नाहीये. ताप उतरावेत आणि लवकर सुरू व्हावं रुटीन. कामं वाट पाहताहेत"


कविता महाजन यांची फेसबुकवरची ही शेवटची पोस्ट... वसईहून काही दिवसांपूर्वीच त्या पुण्यात मुलीकडे रहायला गेल्या. पण हे स्थलांतर त्यांना अजिबातच मानवलं नाही... गुरूवारी संध्याकाळी बाणेरच्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये न्यूमोनियानं त्यांचं निधन झालं. कविता महाजन गेल्या... आपली एकुलती एक कन्या दिशा हिला मागे सोडून...


ब्र, भिन्न सारख्या बहुचर्चित कादंबऱ्या, कुहू ही मल्टिमीडिया कादंबरी, ग्राफिटी वॉल हा लेखसंग्रह, इश्मत चुगताईंच्या रजई या लघुकथासंग्रहाचे भाषांतर, धुळीचा आवाज हा काव्यसंग्रह यासह लहान मुलांसाठी लेखन, संशोधन, लेखसंग्रह, फेसबुकवरील लिखाण असं सगळं सगळं मागे सोडून कविता महाजन यांनी निरोप घेतलाय.


मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या कन्या. शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात झालं. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी मराठी साहित्यामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ठ वाड्:मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाई पुरस्कार, साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार, 'जोयनाचे रंग' या कथासंग्रहासाठी राज्यस्तरीय पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते. 


वसईहून काही दिवसांपूर्वीच त्या पुण्याला राहायला गेल्या होत्या. नव्या जोमानं लेखन करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यापुर्वीच मृत्यूनं त्यांना गाठलं... ज्या मृत्यूलाच त्यांनी शब्दबद्ध केलं होतं...


तुझी सगळी तगमग


मुरवून घेईन मी तनामनात


आणि मग


तुझ्या मुठीतून निसटून जाईन


हळूहळू वाळूसारखी


ओघळेन तुझ्या डोळ्यातून नकळत


वाहणा-या पाण्यासारखी


मी जाण्यापूर्वी हसतमुख


एक क्षणभर समोर उभा रहा माझ्या


निरोप दे


चिमूटभर शांततेचं बोट


माझ्या कपाळावर टेकव