कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिल वसूल केले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने बिले तपासण्यासाठी फ्लाईंग स्कॉड तैनात केले आहे. या स्कॉड द्वारे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याबरोबरच दिवसाला 4 ते 5 रुग्णालयांमध्ये सरप्राईज व्हिजिट केली जात आहे. या व्हिजिटमध्ये रुग्णांना आकारल्या जाणाऱ्या बिलाची तपासणी केली जात असून रुग्णालयांना शासकीय दराप्रमाणेच उपचार खर्च घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याखेरीज खाजगी रुग्णालयासाठी 2 दिवसांपूर्वी आदेश काढून खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड पालिकेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून या बेड भरल्यानंतरच रुग्णालयांना 20 टक्के बेड वापरता येतील. रुग्णालया बाहेर डॅश बोर्ड वर या बेडची माहिती नियमितपणे प्रसिद्ध करण्याचे तसेच पोस्टरवर देखील बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.


यावेळी रुग्णांकडून अतिरिक्त बिल वसूल केले जाणार नाही याची काळजी पालिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवलीमध्य कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे धारावी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय देखील याआधीच घेण्यात आला. त्यामुळे प्रशासनापुढे आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान आहे.