शिवसेनेने शिवजयंतीच्या पोस्टरवर `या` राजांचा फोटो लावला, भाजपकडून टीका
शिवसेनेनं शिवजयंतीचे पोस्टर्स लावले पण... भाजपची शिवसेनेच्या बॅनरबाजीवर जोरदार टीका
आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : शिवसेनेकडून (ShivSena) काल तिथीनुसार शिवजयंती (ShivJayanti) उत्सव साजरा करण्यात आला. यासाठी डोंबिवली (Dombivali) शहरात ठीक ठिकाणी बॅनर लावून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.
पण डोंबिवलीमध्ये लागलेले काही बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ऐवजी चक्क छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला होता.
याच बॅनरबाजी वरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केलं. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. यांचा पिंड हिंदुत्व नाही, यांना हिंदुत्व काय हे आधी माहीतच नव्हतं, हे उसनवार घेतलेले शहर प्रमुख आहेत म्हणून अशा चुका घडतात अशी टीका चव्हाण यांनी केली.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे यांनी डोळे उघडले आहेत की नाही हे पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यातच आता बॅनर वरून पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला लक्ष केलं. शहर प्रमुख राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात नंतर प्रतिक्रिया देईन अस सांगितलं