हजारो डोंबिवलीकर होणार बेघर, हायकोर्टाने सांगितलं त्या 65 इमारती जमीनदोस्त करा!
Dombivli Illegal Buildings Demolition Order: 3 महिन्यात बेकायदा इमारती जमीनदोस्त करा, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. हजारो नागरिकांना बेघर होण्याची भीती
Dombivli Illegal Buildings Demolition Order: कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील 65 इमारतींबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहे. येत्या तीन महिन्यात बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशामुळे केडीएमसीतील 65 बेकायदा इमारतींवर हातोडा पडणार आहे. त्यामुळं हजारो नागरिकांना बेघर होण्याची भिती सतावत आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळविल्याचे भासवून ''रेरा'' प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या 65 बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करा, असे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे या बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी महापालिकेच्या हद्दीतील 65 इमारतींना महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून बिल्डरांनी ''रेरा'' प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. ही बाब पाटील यांनीच माहिती अधिकारात उघड केली. त्यानंतर या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर 19 नोव्हेंबरला सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
विधानसभा निवडणुकीमुळे पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई करता आलेली नाही. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल. त्यावर येत्या तीन महिन्यांत या 65 बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. केडीएमसीने 17 इमारतींवर या अगोदर दिखावापूर्ती कारवाई केली होती मात्र 48 इमारती यांच्यामध्ये कारवाई केलेली नाही. काही इमारतीमध्ये नागरीक वास्तव्य करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.
65 इमारतींमधील पाच इमारती एमआयडीसी, एमएमआरडीए हद्दीत येतात. उर्वरित 58 इमारती पालिका हद्दीतील आहेत. त्यामधील 57 इमारती अनधिकृत घोषित करण्याची कार्यवाही पालिकेने पूर्ण केली आहे. सहा इमारती भुईसपाट केल्या आहेत. चार इमारती अंशता तोडल्या आहेत. तर 48 बेकायदा इमारतींमध्ये पूर्ण क्षमतेने रहिवासी आहेत.
शुक्रवारी एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद
जांभूळ जलशुद्धिकरण केंद्र व बारावे गुरुत्वावहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवारी २४ तास करण्यात येणार आहे. या कामामुळे एमआयडीसी, कल्याण डोंबिवली तळोजा, डोंबिवली महापालिकेचा काही भाग, उल्हासनगरचा काही भाग, आदी ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले. कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही. एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहे.