अश्विनी पवार , झी मीडीया, पुणे : काही मोजकेच क्रीडाप्रकार सोडले तर परदेशी क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय खेळाडू फारसे वळताना दिसत नाहीत. मात्र असं असताना केवळ देशातच नाही तर जगातही दुर्मिळ असणारा केटलबेल सारखा क्रीडाप्रकार भारतात रुजत आहे आणि त्यासाठी पुण्यातील पराग मेहेत्रे हा खेळाडू जीवापाड मेहनत घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केटलबेल ! हे नाव देखील भारतीय क्रीडा विश्वाला नवीन आहे. मात्र असं असतानाही पुण्याच्या पराग मेहेत्रे या खेळाडूनं या खेळामध्ये गगन भरारी घेतलीये.गेल्या वर्षी कझाकिस्तान इथं झालेल्या वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडल मिळवणारा तो पहिला भारतीय ठरलाय. तर केटलबेलमधील अनेक अंतरराराष्टीय स्पर्धांमध्येही त्यानं आपला ठसा उमटलाय. 


इंजिनिअऱ असलेल्या पराग हा नोकरीनिमित्त अमेरिकेमध्ये असताना त्याला या खेळाविषयी माहिती मिळाली. याचं क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याने आपली नोकरी सोडली. 2011 मध्ये वर्ल्ड केटलबेल क्लबकडून केटलबेल फिटनेस ट्रेनरचं प्रमाणपत्र मिळवणारा पराग  पहिला भारतीय ठरला. 


परागनं आता या खेळासाठी एनर्जी केटलबेल फिटनेस अकादमीची स्थापनाही केलीय. केटलबेल हा फिटनेस आणि स्टॅमिना राखण्यासाठीही एक उत्तम क्रीडाप्रकार आहे. यामुळे इतर खेळातील खेळाडूही परागकडे या खेळाचं प्रशिक्षण घेतात. 


रशियाचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाणारा केटलबेल जगभरातील ३० ते ४० देशांमध्ये  खेळला जातो. परागच्या प्रयत्नांमुळे भारतातही केटलबेलमध्ये शेकडो खेळाडू तयार होत आहेत. त्याच्या या प्रयत्नांना केवळ शासनाच्या प्रोत्साहनाची गरज आहे.