Fadnavis Ajit Pawar Birthday Dinner Party Cancelled: मुसळधार पावसामुळे रायगडमधील (raigad news) इरसाल गडाजवळील (Irshalgad) इरसालवाडीमधील आदिवासी पाड्यावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरडीखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून या ठिकाणी मदत कार्य सुरु आहे. मात्र या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला विशेष मेजवानीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.


दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी कार्यक्रमाचं आयोजन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलैच्या पहिल्या आठवड्यांमध्ये अजित पवार गट शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर राज्याला पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री मिळाले. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी आहे. याचनिमित्ताने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महायुतीच्या आमदारांसाठी 20 जुलै रोजी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. मात्र इरसालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.


तो पैसा मदतीसाठी वापरा


अजित पवार यांच्या कार्यालयाकडून कार्यक्रम रद्द झाल्यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इरसालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इरसालवाडी गावाच्या मदतीसाठी आणि या दुर्घटनेचा फटका बसलेल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इरसालवाडीला आज सकाळी साडेसात वाजता भेट दिली. तर त्यापूर्वी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन रात्री सव्वातीन वाजताच घटनास्थळी दाखल झाले. "बचावकार्य सुरु असून पाऊस बराच असल्याने त्यामध्ये अडचणी येत आहेत. मी रात्री तीन वाजल्यापासून वरती आहे. माती घरांवर कोसळ्याने ती दबली आहेत. इथे येण्याचा मार्गही कठीण आहे. पाऊस जोरात असल्याने काम करणं शक्यच नाही. मातीचा ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणं फार कठीण काम आहे. या गावाची लोकसंख्या अडीचशे आहे. त्यातील 70 ते 80 लोकांची माहिती मिळाली आहे. बचावलेल्यांचा आकडा किती असेल हे सांगणे कठीण आहे. नातेवाईकांकडे चौकशी सुरु आहे. मृतदेह बाहेर काढणं सुद्धा कठीण आहे. दोन ते तीन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत. कारण मातीचा ढिगारा घरांवर येऊन पडला आहे. पाऊसही थांबत नाहीये. इथे हेलिकॉप्टर येणे देखील शक्य नाही," अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.