शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर ( Khanapur) गावात मात्र हा फार्मूला बाजूला ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही दुसरीकडे स्थानिक पातळीवर लढविल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर ( Khanapur) गावात मात्र हा फार्मूला बाजूला ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ( Khanapur Gram Panchayat Election) शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची (BJP-Congress-NCP alliance) साथ घेतली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूकीकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका अनेक ठिकाणी बिनविरोध होत आहेत. मात्र, कोल्हापुरात भाजपला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागली आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याच गावात ही नवी युती दिसून येत आहे. या युतीची राज्यात चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही, असे भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, ग्राम पंचायत निवडणुकीत त्यांचीच साथ घ्यावी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या निमित्ताने सध्या राजकीय रणधुमाळी रंगली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या गावातील युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोधात भाजप असे राजकीय चित्र असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच गावात मात्र भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष शिवसेनेविरोधात एकत्र आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी आता प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. भुदरगड तालुक्यातील या गावात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हे गाव. या गावात दोन तीन महिन्यात अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी गट बदलले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले प्रवीण सावंत भाजपमध्ये गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भाजपवासी झाले. यातून गावात राजकीय चुरस निर्माण झाली. शिवसेनेला रोखण्यासाठी मग भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मदत घेतली. यामुळे या गावात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली. त्यांच्या विरोधात आता शिवसेना लढणार आहे.