खोपोलीत साडे चार वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या, नरबळी की बलात्कार?
या चिमुरडीचं कुटंब मूळचं उत्तर प्रदेशातील असून या हंगामात मोल-मजुरीसाठी ते महाराष्ट्रात आले होते
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, खोपोली : खोपीली शहरानजिक शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात पोलिसांना एका साडे चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. अतिशय क्रूर पद्धतीनं या चिमुरडीला ठार करण्यात आल्याचं समोर येतंय. मंगळवारपासून आशा बेपत्ता झाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पंचनामा करत आहेत.
पोलिसांना चिमुरडीच्या मृतदेहाचे दोन तुकडे सापडलेत. या चिमुरडीचं धड आणि शीर असे दोन तुकडे करून झाडीत वेगवेगळया ठिकाणी फेकण्यात आले होते. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चटके दिल्याच्याही खुणा पोलिसांना आढळल्या आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा, असा संशय पोलिसांना आहे.
परंतु, महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चिमुरडीच्या मृतदेहाची पाहणी केली असता तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चिमुरडीचा मृतदेहावर पोस्टमॉर्टेम पार पडल्यानंतर तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.
कुटुंबावर शोककळा
या चिमुरडीचं कुटंब मूळचं उत्तर प्रदेशातील असून या हंगामात मोल-मजुरीसाठी ते महाराष्ट्रात आले होते. तिचे वडील ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतात. काल सकाळपासून चिमुरडी बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती सापडली नाही. आज सकाळीच तिचा मृतदेह सापडल्याची बातमी आली आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेने खोपोली शहर आणि परीसरात खळबळ उडाली