Hingoli Farmer Loss : हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती यंदा अधिकच बिकट बनली असल्यानं त्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहेत. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगावमधील 10 शेतक-यांनी आपली किडनी, यकृत आणि डोळे चक्क विक्रीला काढलेत. तसं निवेदन त्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. किडनी 75 हजारांना 10 नग, यकृत 90 हजारांना 10 नग आणि डोळे 25 हजारांना 10 नग विक्रीला असल्याचा व्हिडियो या शेतक-यांनी आपल्या मोबाईल क्रमांकासह समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. 


शेतकऱ्यांचे अवयव विक्रीचे निवेदन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यंदा अधिकच बिकट बनली असून खरीप हंगामात पावसाने दिलेली उघडीप, त्यानंतर येलो मोझॅकचा झालेला प्रादुर्भाव,यामुळे पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून दुष्काळाच्या यादीतूनही हिंगोली जिल्हा वगळण्यात आलाय, पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. म्हणून सेनगाव तालुक्यातील गोरेगावच्या दहा शेतकऱ्यांनी आपली किडनी, लिव्हर आणि डोळे चक्क विक्रीला काढलेत तसे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनही या शेतकऱ्यांनी पाठवले आहे.


अल्प दरात अवयव विक्री


विशेष बाब म्हणजे अल्प दरात आपले अवयव शेतकरी विकणार आहेत, किडणी 75 हजार रुपये,दहा नग, लिव्हर 90 हजार रुपये, दहा नग आणि डोळे 25 हजार रुपये, दहा नग विक्रीला असल्याचे फलक तयार करून त्यावर आपला नंबर टाकून शेतकऱ्यांनी तो फलक समाज माध्यमांवर व्हायरल केलाय. 


खाजगी, सरकारी बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज व इतर उसनवारी करून आम्ही खरीपात पेरण्या केल्या आहेत. मात्र, नंतर पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक उध्वस्त झाले. बोंडअळी लागल्यामुळे कापूस सुध्दा उध्वस्त झाला. थोडंफार पीक आमच्या पदरी पडले. त्याला योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे आम्ही बँकेचे कर्ज परतफेड करायचे तरी कशे.? असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यात शेतमालाला ही भाव मिळत नाही, अनुदान नाही. आम्ही पीक कर्ज भरायचे तरी कसे? त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आमचे अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतलाय असे शेतकरी सांगतायेत, दिलेल्या निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.