किरीट सोमय्या यांना संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज
किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखल्यानंतर...
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी शिवसैनिकांनी राडा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना धक्काबुक्कीही केली. या गदारोळात सोमय्या पायऱ्यांवर पडले. यात दुखापत झालेल्या सोमय्या यांना संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवायचं काम लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं.
संजय राऊत यांचा व्यावसायिक भागिदार सुजीत पाटकर याच्या बनावट कंपनीने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. त्यामुळे शिवसैनिक बिथरले आणि त्यांनी अचानक महापालिकेबाहेर राडा केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध केलाय... तर या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय. सध्या या प्रकरणामुळे राजकारण चांलचं तापलं आहे.
नक्की प्रकरण काय?
सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या राऊतांविरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी जात होते. नेमकं याच वेळेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळेस हे कार्यकर्ते सोमय्या यांच्या अंगावरही धावून गेले. त्यामुळे प्रकरण आणखी वाढलं. अनेक प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या 5 वर्षांत एकाही प्रकल्पाचं नीट काम झालं नाही असे खोटे आरोप करण्यात आले.
शिवसेनेवर केलेले खोटे आरोप खपवून घेणार नाही असाही इशारा यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना दिला आहे. भाजप नेत्यांकडून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. तर किरीट सोमय्या यांनी याबाबत सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.