नाशिक : शेतकरी आणि मजुरांच्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यामुळं किसान सभेचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. सकाळी नऊ वाजता नाशिकमधून या मोर्चाला सुरुवात झाली. हजारो शेतकरी आणि आदिवासी यांनी मुंबईकडं कूच केलं आहे. नाशिकमध्ये किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि पालकमंत्री गिरीश महाजनांची बैठक निष्फळ ठरली. कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू न शकल्यानं किसान सभा मोर्चा निघाला आहे. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लेखी हमीपत्र देणार नाही तोपर्यंत लाँग मार्च सुरूच राहणार असल्याचं जेपी गावित यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाशिकच्या गोदाकाठावरून घोंगावणारे लाल वादळ मुंबईच्या अरबी समुद्रात जाऊन धडकणार आहे.


वर्षभरापूर्वी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे नशिक ते मुंबई असा हा मोर्चा निघाला आहे. मोर्चा सुरु झाल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. मागच्या वर्षी देखील आपल्या मागण्यांसाठी हा मोर्चा मुंबईत धडकला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. या गोष्टीला आता वर्ष उलटलं असलं तरी मागण्या पूर्ण न झाल्याने किसान सभा पून्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघाली आहे.