कोल्हापूर : कोल्हापुरातील यादव नगरमध्ये सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय. यामध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची बंदूकसुद्धा हल्लेखोरांनी लंपास केलीय. या घटनेनंतर यादव नगर परिसराला मध्यरात्री पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलिसांनी रात्रभर यादव नगर परिसरात शोध मोहीम राबवीत हल्लेखोरांचा शोध घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी अपर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा या पाच-सहा कर्मचाऱ्यांच्या पथकासह यादव नगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी यादवनगरमधील 'सलीम मुल्ला इंडियन ग्रुप' या इमारतीच्या मागील बाजूस मटका अड्डा सुरू असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर शर्मा यांच्या पथकानं कारवाईला सुरुवात केली. 


या कारवाईचाच एक भाग म्हणून शर्मा मटका चालक सलीम मुल्ला यांच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिक महिला आणि तरुणानं दंगा करायला सुरुवात केली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह परिसरातील महिलांनी आणि तरुणाने शर्मा यांच्या पथकावर चाल केली. दहा पंधरा मिनिटाच्या झटापटीत शर्मा यांच्या अंगरक्षकांची बंदूक एका तरुणानं हिसकावून घेऊन त्याच बंदुकीनं पथकाला दम दिला. यानंतर या घटनेचे गांभीर्य वाढले. शर्मा यांनी या घटनेची माहिती पोलीस मुख्यालयाला दिली. तातडीने पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले... त्यानंतर त्यांनी हल्लेखोरांचा कसून शोध सुरू केलाय.