Kolhapur Crime : गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचा थरार सुरु झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र या अतिउत्साहात कोल्हापुरात एकाच जीव गेला आहे. आयपीएलच्या संघामधील लोकप्रियतेमुळे लोक कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. आयपीएलचा सामना पाहत असताना झालेल्या भांडणात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकाराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे.
 
कोल्हापुरच्या करवीर तालुक्यातील हणमंतवाडी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. हणमंतवाडी बुधवारी रात्री दोन गटात रात्री आयपीएल सामन्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीत बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या चुलत्या आणि पुतण्याने लाकडी फळी व काठीचा वापर करत बंडोपंत बापू तिबिले यांना गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात तिबिले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिबिले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?


27 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग यांच्यात सामना सुरु होता. रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले, सागर झांजगे व बळवंत झांजगे टीव्हीवर आयपीएलचा सामना पाहत होते. त्यावेळी रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्मा बाद होताच बंडूपंत तिबिले यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बंडू तिबिले व बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली. मात्र तिबिले यांच्या या कृतीचा सागर झांजगे व बळवंत झांजगे यांना राग आला. या मस्करीचे रुपांतर घराबाहेर पडताच मोठ्या भांडणात झालं.


रागाच्या भरात लाकडी फळी व काठीचा वापर करत सागर झांजगे व बळवंत झांजगे यांनी बंडोपंत बापू तिबिले यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात बंडोपंत तिबिले गंभीर जखमी झाले. तिबले यांच्या कानातून नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली. गंभीर जखमी झालेल्या बंडूपंत तिबिले यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिबिले यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


दरम्यान, याप्रकरणी या प्रकरणातील संशयित आरोपी सागर झांजगे व बळवंत झांजगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिबिले यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे.