अभीषेक अडेप्पा, झी मीडिया, बार्शी : राज्यात आरोपींना कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आरोपींनी अत्याचार (Minor Girl Assaulted) केला. त्यानंतर तिच्या घरात घुसून तिच्यावर कोयत्याने वार केले. बार्शीत (Barshi) ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनीही यात दिरंगाबई केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
5 मार्चला पीडित मुलगी खासगी शिकवणी संपल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन घराकडे परतत होती. यावेळी दोन तरूणांनी कासारवाडी रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ त्या मुलीची दुचाकी अडवली. त्यानंतर तिला एका आडोश्याला नेऊन तिच्यावर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने केली आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीने घरी आल्यावर वडिलांना दिली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


पोलिसांची कारवाईत दिरंगाई
गंभीर घटना असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याऐवजी हरगर्जीपणा दाखवला. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपींनी थेट पीडित महिलेच्या घरात घुसून पोलिसात तक्रार दिल्याचा जाब विचारला. यावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी पीडित मुलीवर कोयता आणि सत्तूरने वार केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. आरोपींना तात्काळ अटक करणं अपेक्षित असताना त्यांना  पोलिसांनी यामध्ये दिरंगाई केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. 


हलगर्जी करणारे पोलीस निलंबित
याप्रकरणाची गंभीर दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी  सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलिस हवालदार राजेंद्र मंगरूळे या दोघांसह बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका गुटकूल, पोलीस हवालदार भगवान माळी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्यामार्फत पुढील चौकशी करण्यात येणार आहे. या सर्व घटनेमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.


आरोपींना ठोकल्या बेड्या..
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आरोपींवर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय माने आणि नामदेव दळवी असं या दोन नराधम आरोपींचं नाव आहे. आरोपींना बार्शी न्यायालयात हजर केल्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र कोर्टाने त्यांना 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.