प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : व्यसनासाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. दारु (alcohol) पीत असल्याची माहिती घरात सांगितल्याच्या रागातून एका तरुणाने वृध्द महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केलाय. कोल्हापूर (kolhapur crime) शहरातील सुभाषनगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याने  कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (kolhapur police) संशयित आरोपीला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय 65, मूळ गाव कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या राहणार संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. तर प्रतीक विनायक गुरुले (वय 22, रा. प्लॉट नंबर 4, संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 65 वार्षीय लक्ष्मी क्षीरसागर या 21 तारखेला रात्री आठच्या सुमारास नवरात्र कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरीच परतल्या नाहीत.


त्यामुळे क्षीरसागर कुटुंबियांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. त्याचबरोबर पोलिसात देखील तक्रार दिली. दरम्यान सुभाषनगरमध्ये हरिव चर्चच्या कंपाऊंजवळ एका वृद्धेचा दगडाने ठेचून खून झाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा मृतदेह लक्ष्मी क्षीरसागर याचा असल्याचे स्पष्ट झालं. या नंतर पोलिसांनी संशयित प्रतीक गुरुले याला ताब्यात घेवून चौकशी केली. 


तीन आठवड्यापूर्वी लक्ष्मी क्षीरसागर यांनी प्रतीकला दारू पिताना पाहिले होते. यानंतर लक्ष्मी क्षीरसागर यांनी त्याची माहिती प्रतीकच्या कुटुंबियांना दिली होती. यामुळे प्रतीकचे त्याच्या कुटुंबियांशी भांडण झाले होते. या सगळ्या प्रकारामुळे लक्ष्मी क्षीरसागर यांच्याबद्दल प्रतीक गुरुलेच्या मनात राग भरला होता. अशातच 21 तारखेला रात्री प्रतीक पुन्हा दारू पित बसला होता. यावेळी लक्ष्मी क्षीरसागर यांनी पुन्हा प्रतीकला दारू पित असताना पाहिले. प्रतीकला पाहून लक्ष्मी क्षीरसागर यांनी पुन्हा दारू पित बसला आहेस मी तुझ्या घरी सांगते असे म्हटलं. त्यावेळी राग सहन न झालेल्या प्रतीकने लक्ष्मी क्षीरसागर यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेची राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी प्रतीक गुरुले याला अटक केली आहे.