प्रताप नाईक / कोल्हापूर : आमदारकी नको, गोकुळचं संचालकपद ( Gokul) द्या, अशी परिस्थिती सध्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात दिसून येत आहे. कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh ) सर्वसाधारण वार्षिक सभा उद्या 3 फेब्रुवारीला होत आहे. (Gokul Dudh Sangh General Annual Meeting) निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही सभा यंदा वादळी होण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोकूळ. संपूर्ण राज्याला दूध पुरवणारा कोल्हापूरचा बलाढ्य दूधसंघ... या दूधसंघाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात असाव्यात, यासाठी मोठं राजकारण रंगतं... सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा डोळा असतो तो गोकूळच्या संचालकपदावर. म्हणूनच तर एकवेळ आमदारकी नको, पण गोकुळचं संचालकपद द्या, अशी म्हण कोल्हापुरात आहे. (Gokul Dudh Sangh)


गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ गोकूळवर काँग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता उलथवून लावण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची आघाडी पुढं सरसावलीय. तर सत्ता अबाधित राखण्यासाठी महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांनी कंबर कसली आहे.



गोकुळच्या सत्ताकरणाचा वापर सत्ताधारी राजकीय स्वार्थापोटी करतात, असे आरोप यापूर्वीही झालेत. दूध वितरणासाठी लागणाऱ्या टँकरची मालकी बहुतांश संचालक मंडळाच्या सदस्यांचीच असते. त्यातून त्यांना कमाई होते, असा आरोप वारंवार केला जातो. 


गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या वारेमाप खर्चाचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. त्यावरून गोकूळच्या वार्षिक सभेत महाडिक आणि पाटील गट पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. त्यावेळी काय घडतं, याकडं कोल्हापूरकरांचं लक्ष लागले आहे.