कोल्हापूर महापौर आणि उपमहापौरपदाची आज निवडणूक
काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ता राखणार का ?
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. दोन्ही पक्षाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार महापौरपद सध्या राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने महापौर पदासाठी अॅड. सुरमंजिरी लाटकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे; तर भाजप आणि ताराराणी आघाडीकडून भाग्यश्री शेळके ह्या निवडणूक लढवत आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी कडून संजय मोहिते हे निवडणूक लढवीत आहेत; तर त्यांच्या विरोधात भाजप आणि ताराराणी आघाडीकडून कमलाकर भोपळे हे निवडणूक लढवीत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडे बहुमत आहे. मात्र भाजप आणि ताराराणी आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला जातोय.त्यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही पक्षानी आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठवलं आहे.
विरोधी पक्षात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीकडे बहुमताचा आकडा नसल्याने त्यांच्याकडून सत्तास्थापनेच्या कोणत्य़ाही हालचाली दिसत नाहीत.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४४ नगरसेवक आहेत. तर विरोधीपक्षात असलेल्या भाजप- ताराराणी आघाडीकडे ३३ नगरसेवक आहेत. शिवसेनेकडे चार नगरसेवक आहेत.