कोल्हापूर : चक्क मृत व्यक्तीला पुन्हा महापालिका सेवेत घेण्याचा ठराव कोल्हापूर महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. महापालिका सभागृहाचा अजब कारभार समोर आला आहे. विशेष म्हणजे, सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी, विरोधी भाजप-ताराराणी आघाडीसह शिवसेनेने एकमताने हा ठराव मंजूर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील सुरेश कोल्हे हे महापालिकेकडे सफाई कामगार म्हणून नोकरीला होते. प्रदीर्घ आजारपणामुळे ते दीर्घकाळ गैरहजर असल्याचे कारण देत यांच्यासह ९ जणांना सेवेतून २००१ मध्ये बडतर्फ करण्यात आल.मात्र यापैकी ८ जणांना २००२ मध्ये घेण्यात आले.मात्र कोल्हेना डावलले गेले.एका पायाने अधू असतानाही सुरेश कोल्हेनी पालिकेत खेटे मारले. मला नाहीतर आपल्या पुतण्याला तरी नोकरीत घ्यावे अशी मागणी करण्याची अनेक पत्रे लिहली. मात्र ढिम्म प्रशासनाने यावर कोणतीही कृती केली नाही. 


अखेरीस २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले.मात्र त्यांच्या निधनानंतर तब्बल दोन वर्षानी त्यांना सेवेत पुन्हा घ्यायचा सदस्य ठराव सोमवारच्या सभेत मंजूर करण्यात आला.कोल्हापूर महापालिकेच्या या कृत्याबद्दल कोल्हे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करत सुरेश कोल्हेच्या मृतानंतर तरी त्यांना न्याय मिळेल का? असा सवाल केलाय.


या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल महापौरांनी घेतली आहे. एखाद्या माणसाला प्रशासकीय यंत्रणा कशी छळते याचे उत्तम उदाहरण या घटनेतून पुढे आलेय.शिवाय कोणताही अभ्यास न करता आणि ठरावावर चर्चा न करता विषय कसे मंजूर होतात याचा आंधळा कारभारही चव्हाट्यावर आलाय.अश्या महापालिकेचा कारभार सुधारणार तरी कधी? अशी विचारणा आता नागरिकामधून होतीय.