कोल्हापुरात मटण दरावर अखेर तोडगा
मटण खवय्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जातं आहे. कोल्हापूरकरांचं नेमकं काय
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात अखेर मटण दरावर तोडगा निघालाय. 520 रुपये प्रति किलो मटण विकण्यावर एकमत झालंय. त्यामुळं मटण खवय्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जातं आहे. कोल्हापूरकरांचं नेमकं काय ठरलंय. मटण दरवाढ ही कोल्हापुरकरांसाठी राष्ट्रीय आपत्ती नव्हती... पण राष्ट्रीय आपत्तीपेक्षा कमी देखील नव्हती.
कारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोल्हापूरकरांना जेवणात तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटण लागतंच.... मग मटणाचे दर वाढल्यानंतर कोल्हापूरकर गप्प कसे बसतील..? त्यासाठी त्यांनी आंदोलनाचं शस्त्र उगारलं.
पहिली ठिणगी पडली कसबा बावड्यात... मटण घ्यायचं, पण नदी पलीकडून असं म्हणत बावड्यातील नागरिकांनी मटण विक्रेत्यांवर बहिष्कारच टाकला... त्याचं लोण अख्ख्या कोल्हापुरात पसरलं. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून मटण दर निश्चितीसाठी समिती नेमली.
तरी मटण विक्रेते वठणीवर येत नाहीत म्हटल्यानंतर कोल्हापूरकरांनी मटणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ही मात्रा बरोबर लागू पडली.
अखेर मटण विक्रेत्यांनी दोन पावलं मागे घेत, ५२० रुपये किलोनं मटण देण्याचं मान्य केलं. यामुळं कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला पूर्णविराम मिळालाय. तर खवय्यांनीही या तोडग्याचं तोंड भरून स्वागत केलं आहे.
कोल्हापूरकरांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं... मग ते राजकारण असो, नाहीतर मटणाचा दर... आता स्वस्तात उत्तम दर्जाचं मटण मिळणार असल्यानं कोल्हापूरकरांची तब्येत खुश होणार, एवढं नक्की.