प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur) आज हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काही तरुणांनी औरंगजेबाचं (Aurangazeb) स्टेटस लावल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली.  सकाळी शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र जमत मोठी घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.  कोल्हापूर शहराचं मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या शिवाजी चौकात आंदोलन सुरु होतं. पण दुपारी 12 वाजल्यानंतर जवळपास दोन तास या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही आंदोलकांनी दगडफेक आणि तोडफोड केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. कोल्हापूरचे आयजी फुलारी स्वत: रस्त्यावर उतरले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कोल्हापूरात जमावबंदी लावण्यात आली आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


इंटरनसेवा बंद
सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जातात. यासाठी कोल्हापुरात इंटरनेट सेवा (Internate) बंद करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा हातात घेऊ नका, कायदा हाती घेणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. कोल्हापुरातल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) म्हटलंय. 


गृहमंत्र्यांनी दिला इशारा
कोल्हापूरमधील घडामोडींची गंभीर दखल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) घेतलीय. औरंगजेबची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच असं फडणवीसांनी ठणकावलंय. दोषींवर कठोर कारवाई करा तसंच कोल्हापूरमधली परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणा अशा सूचनाही फडणवीसानी  दिल्यात. जनतेनेसुद्धा शांतता पाळावी आणि कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळवी घ्यावी असं आवाहनही फडणवीसांनी केलंय.. पोलिस सुद्धा कारवाई करतेच आहे. 
त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत.


शरद पवारांनी केला आरोप
औरंगजेब, टिपू सुलतानच्या उदात्तीकरणावरून आता राजकीय वाद पेटलाय. अशा चुकीच्या गोष्टींना धार्मिक रंग देण्यास सत्ताधाऱ्यांचंच प्रोत्साहन आहे असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला. त्यावर विरोधकांकडूनच अशा गोष्टींना फूस दिली जात असल्याचा पलटवार फडणवीसांनी केला.  तर राज्यातल्या दंगलींना विरोधक नाही तर सरकार जबाबदार आहे, हे सरकारचं अपयश आहे असं टीकास्त्र खासदार सुप्रिया सुळेंनी डागलं.  औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, त्यांना पाकिस्तानात हाकलून द्या अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला.