कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ४३ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदी काठच्या परिसरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९५ टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील ९ राज्यमार्ग तर २६ जिल्हा मार्गांवर पुराचं पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. 


नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर शहरातील पुराने बाधित होणाऱ्या १८ प्रभागातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुराने बाधित होणाऱ्या प्रभागातील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि नियंत्रण कक्षांशी संपर्क साधला. एनडीआरएफची राज्यात १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापूरमध्ये आहेत.