COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर : कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होतो. हा संसर्ग टाळण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांना आपापल्या घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण अनेक नागरिक जीव धोक्यात घालून अवैधरित्या प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 


पुणे-मुंबईहुन शंभरहुन अधिक गाड्या टोल नाक्यावर पोहचल्याचे देखील किनी टोल नाक्यावर पाहायला मिळाले. संचारबंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणात माणसं घराबाहेर कशी पडली ?  मुंबई पुण्यामध्ये या गाड्यांची तपासणी झाली नाही का ? याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 


किणी टोलनाक्यावर रुग्णवाहिकेतून होणारी प्रवासी वाहतूक अडवण्यात आली आहे. यामधून बनावट रुग्ण प्रवास करत होते. पोलिसांनी रुग्णवाहिकेतील बनावट रूग्ण पकडले असून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. ही रुग्णवाहीका कशी मिळाली ? तिची नोंद कोणाच्या नावावर आहे ? याची पोलीस चौकशी करत आहेत. 


कोल्हापुरच्या किणी टोलनाक्यावर पोलिसांना एक रुग्णवाहिका दिसली. पोलिसांनी चालकाला थांबवून कुठे चालला ? याची चौकशी केली. रुग्णांना घेऊन चाललो असे त्याने सांगितले पण त्याच्या बोलण्यावरून पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी रुग्णवाहिका तपासल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले. रुग्णवाहिकेत बसलेल्यांपैकी कोणीही रुग्ण नव्हते. त्यांना खोट्या पट्ट्या बांधून बसवण्यात आलं होतं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर गाडीतील प्रवासी खरं बोलू लागले. पोलिसांनी या खोट्या रुग्णांना बाहेर काढून पट्ट्या उतरवायला सांगितल्या. 


काही दिवसांपू्र्वी ट्रकला मागे पकडून दोघेजण प्रवास करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात देखील याचा उल्लेख केला. लोकं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. आम्ही गावी जाऊ का ? असं विचारत आहेत. पण असे करण्याने धोका वाढण्याची शक्यता जास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 


असे असताना देखील रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिकेचा उपयोग प्रवासी ने-आण करण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. मध्यरात्री ३ रुग्णवाहिकांमधून एकूण २४ प्रवासी पकडण्यात आले आहेत.