COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारी, स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी रक्कम दिली नसल्याने, त्याची एकूण रक्कम २००० कोटींच्या घरात गेली आहे. साखर आयुक्तांनी कारखान्यांची मालमत्ता आणि साखर जप्त करून, ही रक्कम २५ जून अगोदर शेतकऱ्यांना द्यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २९ जूनला पुण्यातील साखर आयुक्तांना घेराव घालण्यात येणार असल्याचा,इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते  खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.


आगामी निवडणूका शेतीच्या प्रश्नावर


देशातील आगामी निवडणुका या धार्मिक किंवा प्रादेशिक प्रश्नांवर होणार नाहीत. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनच होतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा गावात आयोजित केलेल्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबिरात शेट्टी बोलत होते.


शेतकरी कमळावर तणनाशक मारणार


केंद्रात आणि राज्यात असणारे भाजप सरकार आमच्या सहकार्याने बनले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेते म्हणतात की, कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचे १० आमदार आणि २ खासदार निवडून आणणार असल्याची भाषा करत आहेत. पण आमच्याकडे उत्तम प्रकारचं तणनाशक आहे की ते, तुमचं कमळ औषधाला ही ठेवणार नाही. असा  टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना अप्रत्यक्षरीत्या लागवलाय.